Wednesday, October 5, 2011

माणिकमोती कशासाठी?

शाळेतल्या मित्रांचा २५ वर्ष नंतर शोध घ्यायला निघालो आणि... मला गवसले शाळेच्या संस्कारातून आणि समाजाच्या शिक्षणातून तावून सुलाखून निघालेले माणिक मोती.

शालेय जीवनात ज्याच्या सोबत मस्ती केली, अभ्यास केला, खेळ खेळलो त्यांनी, आणि... आम्ही ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत आमच्या आधी आणि नंतर हि  शिक्षण घेऊन अनेक शाळा सोबत्यांनी धुळे शहराचे, न्यू सिटी हायस्कुलचे नाव जगभरात पोहचवले.

शाळेतल्या शिक्षकांनी आणि पालकांनी केलेल्या संस्कारांची शिदोरी गाठीशी बांधून सातासमुद्रापार नावलौकिक मिळवला त्या सगळ्यांच मित्रांचा आम्हाला अभिमान आहे. हा अभिमान शब्दात व्यक्त करणे तसे कठीण आहेच. तरीही, या मित्रांना सलाम करावा या भावनेने या ब्लॉग ला सुरुवात केली आहे. यात क्रम असा ठरवला नाही, पण जसे सुचत जायील तसे प्रत्येक वेळा नवीन मित्राचे व्यक्ती चित्र यातून मांडायचा प्रयत्न आहे. 

आपणच आपली टिमकी वाजवू नये असे म्हणतात, आयुष्याच्या वाटांवर  चालताना प्रत्येकालाच संघर्ष हा करावाच लागतो, अडचणींना सामोरे जावेच लागते, हे जेवढे खरे आहे, तेवढेच या अडचणींवर मात करण्यासाठी मनाचा कणखरपणा आणि आपल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी असलेली निष्ठा हि असावी लागते. या सगळ्याला परिश्रमाची, सचोटीची जोड मिळाली तर आपणा येणाऱ्या भविष्यात यशोशिखर काबीज करू शकतो. या माणिक मोत्यांनी त्यांच्या आयुष्यात असेच मेहनतीने यशो शिखरे  पादाक्रांत केली आहेत.  म्हणून त्यांचे वेगळेपण या ब्लॉग च्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न असणार आहे. 

त्यांचा संघर्ष हा आपल्या सगळ्यांचा असतो तसाच असेलही पण त्यावर विजय मिळवून याशोपताका त्यांनी फडकावली हे त्यानीचे वेगळे पण आहे. नवीन येणाऱ्या पिढीला त्यांच्या या संघर्षावर विजय मिळवण्याच्या प्रयत्नांची ओळख करून दिली तर हि पिढी सुद्धा आपल्या संघर्षाला अधिक सक्षम पणे सामोरे जाईल यशवंत होईल...